दीपावली शुभेच्छा – काव्यभेट
दरवर्षी दिवाळीत ते त्यांच्या असंख्य चाहत्यांना, मित्रांना, सुहृदांना काव्यमय शुभेच्छा पाठवीत. रसिक त्यांच्या शुभेच्छापत्राची वाट पहात असत. काव्यभेट यायला उशीर झाला तर अस्वस्थ होत, प्रत्यक्ष भेटून घेऊन जात. 'दिवाळी'चे वेगवेगळे अर्थ सांगणारी, तिचे निरनिराळे दर्शन घडवणारी, अनेक रूपे दाखवणारी 'दीपावली शुभेच्छा काव्यभेट' हा त्यांचा काव्यविशेष आणि स्वभावविशेष दाखवणारा उपक्रम त्यांनी थोडी थोडकी नाही, पंचवीस वर्षे चालू ठेवला होता.
-
लखलख करिती अनंत ज्योती
जगताची गाजते दिवाळी !
तेजाच्या या हसऱ्या ओळी
शब्दांविण संदेश सांगती –
"जगणे म्हणजे ज्योत उजळणे
जगणे म्हणजे जिवंत जळणे!"
-
-
प्रतिवर्षी येतेच दिवाळी
प्रतिवर्षी मी लिहितो ओळी
सुखदु:खाच्या सहज भावना
शब्दरूप मी देतो त्यांना !
यंदा पण भासते दिवाळी
हळूच आली हासत गाली
ज्योतींमधुनी लखलखते स्मित
तेच पातलो मीही उधळीत !
-
-
विसर मानवा पडतो याचा
तेजामधुनी आलो आपण
अंधाराच्या साम्राज्याचे
धन्य वाटते त्यास धनीपण.
खोल अंतरी परंतु त्याच्या
बसले आहे दडुनि देवपण
कधी कधी ते येते उसळून
करकरणाऱ्या काळोखातुन !
अनंतातुनी फुटती लहरी,
लहरींच्या त्या होती ज्योती
अन् दडलेल्या देवपणाला
जागवावया भूवर येती.
ज्योती कशाच्या – तेजाच्या या
जणु वाजती सनया मंजुळ
तेजस्वी संदेश सांगती
मानवास हा पवित्र मंगल –
"तेजामधुनी उगम तुझा रे,
अंधाराची बरी न संगत
मृत्यूच्या ओलांडुन सीमा,
तुला प्यायचे आहे अमृत !"
-
-
ही माझी माती – घेउनी तू आपुल्या हाती
घडविलीस देवा – सानुली सुबक एक पणती.
त्या पणतीमाजी – भरू दे स्नेह अंतरीचा
तुझ्या प्रेरणेने – दीप मी उजळीन प्रीतीचा.
ज्योतीने ज्योती – पाजळीन जगी असंख्यात
अगणित ज्योतींचा – आगळा लखलखाट, थाट .
प्रकर्ष तेजाचा – तोच की पापाचा नाश
पापाचा नाश – तीच की प्रीती अविनाश .
ही प्रीती म्हणजे – निरामय अनंत परमेश
ही पणती म्हणजे – दिव्य त्या तेजाचा अंश !!
-
-
उजळे दीपावली?
उमटले अनंतरूपी प्रश्नचिन्ह हे
विचार करुनी नीट मानवा
उत्तर तुजला देणे आहे.
'कशास आलो जन्मा आपण?
काय आजवर जगुनी केले?
काय घेतले जगतापासुन,
आणि जगाला काय अर्पिले?
प्रश्न वाटती साधे सोपे,
परंतु त्याचे अवघड उत्तर
ना तर उरते कशास अजुनी
अंधाराचे राज्य जगावर?
-
-
अर्थ आणखी स्वार्थ नागडा
हा नरकासुर घेरून मारून
शक्ती ओळखा मुक्ति मिळवून
अज्ञानातून, अंधारातून
माणुसकीची ज्योत पेटवा
घराघरातुन, मनामनातुन.
हीच उन्नती, हे सुखसाधन
हीच दिवाळी, हाच खरा सण!
-
-
आषाढीच्या मेघाहून थाट जयाचा वेगळा
प्रतिवर्षी कार्तिकात येतो एक पावसाळा !
अंधाराच्या भूमीवर होते तेजाची शिंपण
प्रकाशाची पिके, शेती, ज्योती येती मोहरून.
ज्योतीतून उमलती आनंदाचे हिरेमोती
तेजाच्या या सुगीलाच, 'दीपावली' म्हणताती !
-
-
भूकंपाचे बसती हादरे,
प्रलय पुरांचे वादळवारे
किड्यापरी माणसे चिरडती,
हसते गाली निष्ठुर नियती !
उगवतोच नवसूर्य सकाळी,
विनाशातुनि विकास उमले
चक्र जगाचे अविरत चाले,
गेला दसरा येत दिवाळी !
अंधाराच्या प्रबळ बळावर,
विजय खळावर, आत्मबळावर,
शिंपा स्नेह नि उजळा ज्योती,
चला पुढे तेजाचे यात्री !
-
-
चंद्रावरती होईल वस्ती,
मंगळ मानव करिल हस्तगत
अणुशक्तीच्या उपयोगाने,
जगात होईल अद्भुत क्रांती.
जिवंत जोवर मानवजाती,
जिवंत जोवर मंगल प्रीती
अखंड तोवर राहील तेवत,
दीपावलीची मंगल पणती !!
-
-
दिक्कालाची चौकट घालुनि
अनंत अवकाशाला
रम्य चित्रपट त्यात रेखिला,
सृष्टी म्हणती त्याला.
त्या चित्राचे चर्मचक्षुंना
रंग दिसावे म्हणुनी
तेज फाकले त्यास दिवाळी
म्हणती जन अज्ञानी !!
-
-
का अवसेच्या समयी येतो दीपावलीचा सण?
ठाऊक नाही खरे तयाचे अरसिकांस कारण.
दीपावलीच्या समयी तारे आकाशा सोडुन
रूप पालटुनी हळूच येती, भूवरती उतरून
त्या रूपाचे हवे कुणा जर तेजोमय दर्शन
नीट निरखुनि पहा निरागस बाळांचे लोचन !!
-
-
मातीच्या पणतीत सानुल्या,
शांत तेवते मंगल ज्योती
बालरूप घेउनी हासते
विश्वात्म्याची अनंत प्रीती
"त्या ज्योतीवर चढते आहे
आज अमंगल दाट काजळी
सावधान जन ! करा निवारण,
दुरिताची ही छाया काळी."
सांगत हा संदेश पातली,
मंद पाउली, खिन्न दिवाळी !!
-