१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

अहा तो क्षण आनंदाचा

 • दिवा दुचाकीला नसावा, व्हावा अंधार
  तसेच रस्त्याने निघावे होऊनिया स्वार
  घराजवळ अगदी दिसावा समोर पोलीस
  पाय लटपटावे व्हावे उरामध्ये धस्स!
  कचऱ्याची गाडी आडवी तेवढ्यात यावी
  त्या निमिषार्धात दुचाकी आपण वळवावी
  योगायोगाने करावा भंग अरिष्टाचा
  छोटा पण मोठा, अहा तो क्षण आनंदाचा!!
 •  
 • अनोळखी कोणी प्रवासी समोर बसलेला
  वाचनात होता रसिक तो गढून गेलेला
  म्हणत "छान छान" त्याने वर केली मान
  अति आनंदाने जाहला क्षणभर बेभान
  बघत राहिलो मी त्याकडे सहज कौतुकाने
  ओळख नसताही म्हणे तो मज आवेगाने
  "अति सुंदर कविता, अहाहा आवडली मजला"
  म्हणत मासिकाचा खुणेसह अंक पुढे केला
  विस्मित मी झालो टाकिता पानावर दृष्टी
  कविता माझीच त्याला आवडली होती!
  बघत राहिला तो माझिया भाव मुखावरचे
  कौतुक मी केले तयाच्या काव्यरसिकतेचे
  अनाहूत त्याचा ऐकुनी खरा अभिप्राय
  शब्दात न मावे वाटले मनामधे काय
  त्यास कसे सांगू मीच त्या लेखक काव्याचा
  मुकी करी वाचा, अहा तो क्षण आनंदाचा!!
 •  
 • कधी न जाणारा निघालो मी बाजारात
  'चला तुम्ही संगे' लाडका 'घरात'ला हट्ट.
  खिशामध्ये रुपये मोजके वीस पंचवीस
  पातळ पत्नीला घ्यायचे उंची फर्मास!
  दुकानात जाता पुढे ये ढीग पातळांचा
  क्षण दो क्षण माझ्या उडाला गोंधळ नजरेचा
  हासत पत्नीने खुणविले, 'निवड करा नीट'
  घडी एक हाती घेतली मीहि भीत भीत.
  आवडला तिजला त्याचा पोत, पदर, रंग
  किमतीतही नाही जाहला मुळी मनोभंग.
  'बांधा' मी म्हटले मोजले रुपयेही वीस
  ओसंडत होता प्रियेच्या वदनावर हर्ष.
  पायपीट नाही न चर्चा नच घासाघीस
  अनुभविले मी या जीवनी अद्भुत सत्यास
  संयम सूज्ञपणा मनाला रुचला पत्नीचा
  दुर्मिळ संसारी, अहा तो क्षण आनंदाचा!!
 •  
 • बेसुमार होती उसळली गर्दी 'जनते'ला
  कशीबशी जागा मिळाली उभी राहण्याला.
  पगारात बढती, मिळाली जागाही वरची
  वार्ता कळलेली 'लाडकी' प्रसूत झाल्याची.
  स्वाभाविक होती आमुची खुशीमधे स्वारी
  म्हणुनि आडवारी पुण्याची होती ही वारी.
  'कर्जतला घ्यावा वडा अन् चिवडा चवदार'
  विचार हा माझा जिभेला आवडला फार
  'गर्दी ही असली, डबा हा कुठे थांबणार?'
  चिंतेने मी या उगीचच झालो बेजार.
  धडाधडा तोच निघुनिया बदलापूर गेले
  अन् बघता बघता पुसट ते नेरळही झाले
  मंदावत वेग थांबली गाडी कर्जतला
  डब्यापुढे अगदी चहाचा stall हसत आला.
  खांद्यावर पडला अचानक मित्राचा हात
  चहा न चिवड्याला मिळाली स्नेहाची साथ.
  विसरू मी केवी, अहा, तो क्षण आनंदाचा?
  घडो प्रवास असा नेहमी पुण्या मुंबईचा!!
 •  
 • सुट्टीच्या दिवशी जाहला हूडपणा काही
  रागाला आली लाडक्या लेकावर आई.
  लागे सोसावा कोवळ्या कोम्भाला मार
  आजीने सुद्धा घेतला नाही कैवार.
  मानी बाळाच्या जिव्हारी गेला अपमान
  वदनचंद्र झाला त्याचा क्षणार्धात म्लान.
  आणि सुरु झाला अबोला माय लेकरात
  रुसून बसला तो चिमुरडा दूर कोपऱ्यात.
  घरात सगळ्यांनी तयाची केली मनधरणी
  शरण हवी होती यावया त्याला प्रिय जननी.
  जननीही मानी न सोडी ती अपुला पीळ
  तुटत जरी होते आतडे आतुनी तीळतीळ.
  शब्द न बोले न घेई अन्नाचा घास
  आईला घडला मुलाच्या संगे उपवास.
  झोपी ते गेले शेवटी कंटाळून सोने
  पदराच्या खाली घेतले ओढून आईने.
  सरे रात्र काळी, उघडता चिमण्याने डोळे
  होते आईने त्याला हृदयाशी धरले.
  ओसरला राग, अबोला दूर पळुनि गेला
  घट्ट आणखी ते बिलगले फूल माउलीला.
  कढत आसवांनी घातले गालांना न्हाऊ
  भुकेजल्या तान्ह्या मिळाला गोड गोड खाऊ.
  साउली न जेथे फिरकते पापातापाची
  अनुपम सौख्याची मिठी ती मायलेकरांची.
  लोभ जयासाठी धरावा पुढल्या जन्माचा
  बाळपणामधला, अहा तो क्षण आनंदाचा!!
 •  
 • मेघ गडगडावे, सुटावा जोराचा वारा
  आणि सुरु व्हाव्या नभातुन टपटप जलधारा
  जलधारांसंगे पडाव्या सडासडा गारा
  भूवर गगनाने करावा हर्षाचा मारा.
  आत आणि शांत असावी आई झोपेत
  वडील त्या दिवशी सुदैवे घरी नसावेत.
  साधावी संधी, पळावे धूम अंगणात
  वेचाव्या गारा होऊनी चिंब पावसात.
  आणि सौंगड्यांची भोवती जमवावी सेना
  'बिया अमृताच्या' वाटुनी द्याव्या सगळ्यांना.
  घटकाभर यावे न काही विघ्न अनुभवास
  आणि टिकावा तो आगळा ओला उल्हास.
  देवांनी हेवा करावा स्वर्गातही ज्याचा
  बालपणामधला, अहा तो क्षण आनंदाचा!!
 • बोलभांड स्त्रीच्या जिभेचा अखंड भडीमार
  तशी पावसाची सारखी सुरु मुसळधार.
  कंटाळुनी यावे दुपारी कामावरून घरी
  अर्धागीचीही असावी खुशीमधे स्वारी
  चहा, शिरा, पोहे भराभर न सांगता व्हावे
  एकांताचा त्या कराया भंग न कुणी यावे
  स्मृतीत कोरावा अहा, तो क्षण आनंदाचा
  मजला आताशा न येतो राग पावसाचा !!
 •  
 • राग वरिष्ठाचा अचानक कचेरीत व्हावा
  आणि घरी येत उगीचच पत्नीचा रुसवा.
  कंटाळुनी जावे कुठे तरी फिरावया दूर
  जिथे जगाची या मुळी ना कटकट कुरकूर.
  शरदऋतु मधली असावी ती सायंकाळ
  अनंत रंगांनी असावे नटले आभाळ.
  बघुनी निसर्गाचा रम्य तो विलास रंगांचा
  लोप सहज व्हावा मनातिल दु:खतरंगांचा.
  साक्षात्कारच तो म्हणावा का न ईश्वराचा
  स्मृतीत कोरावा अहा तो क्षण आनंदाचा!!
 •  
 • समारंभ होता कुणातरी मित्राच्या सदनी
  जमलेल्या तेथे कितितरी रसिक तरुण रमणी.
  लावण्याचे ते पाहुनी विलास रसरंग
  रसिक लोचनांचे धावले रसलोलुप भृंग.
  आकर्षक वसने आकृती त्यातून रेखीव
  एक एक उमले तडागी प्रसन्न राजीव.
  निवांत अवकाशी कुणितरी छेडावे सूर
  त्या स्वरलहरींनी भिजावे हृदयाचे तीर.
  असेच काहीतरी माझिया वृत्तींना झाले
  या जड जगताच्या पलिकडे चित्त उडुनि गेले.
  किती तरी वेळ उभा मी तटस्थ बेभान
  दृश्याने एका वेधिले अवचित अवधान.
  लगबगीने वेगे पातली आतुनि कुणि नारी
  भरली डोळ्यात आकृती तिची पाठमोरी.
  पदर बांधलेला चपलता संयम जणु शिकली
  कळी मोगऱ्याची अंबरामधली लुकलुकली.
  दुरून दिसले की असावा सावळाच रंग
  झेपावू लागे मनाचा उगीच सारंग.
  तोच सुबक हसरे वळविले वदन तिने अपुले
  आणि हाय माझे क्षणातच अधोवदन झाले!
  आवडली मजला, जिच्यावर झालो मी लुब्ध
  होती ती माझी लाडकी अर्धांगी मुग्ध!
  भाव अंतरात उसळला क्षणभर लज्जेचा
  अनपेक्षित तरीही, अहा तो क्षण आनंदाचा!!
 •  
 • दूर नदीकाठी रम्य ते विशाल उद्यान
  सहलीस्तव गेलो मुलांना तेथे घेऊन.
  मखमल गवताची हासरी चहूकडे होती
  उत्सुक वाराही कराया रसिकांशी मैत्री.
  सुबक वृक्ष वेली, सुरस ते सृष्टीचे ग्रंथ
  पुष्प एक एक उमलते मृदुल भावगीत.
  कळ्या गुलाबाच्या देखण्या एका कुंजात
  बघुनि लुब्ध झाले अमुचे नेत्र आणि चित्त.
  काम करीत होता कुणितरी माळी मातीत
  खुरपे हातात, स्नेह पण त्याच्या डोळ्यात.
  ओळखला त्याने अमुच्या भाव अंतरीचा
  दे तोडूनि आम्हा गेंद तो गुलाब कलिकांचा.
  क्षणात बाळांच्या मुखांचे गुलाबही फुलले
  फुले फुलांपाशी दृष्य ते नैसर्गिक गमले.
  स्मरता केव्हांही, अहा तो क्षण आनंदाचा,
  बोथटतो दाह जगातील कंटक शल्यांचा!!
 •  
 • ठरलेल्या वेळी बहुधा रोज भेटणारी
  हसऱ्या नजरेने खुबीने ओळख देणारी
  'बस'मध्ये बाला शिरावी मोहक सुकुमारी
  'सीट' एक 'खाली' असावी आपुल्या शेजारी.
  खेटुनिया अगदी बसावा सुखद पुष्पगेंद
  क्षणभर विसरावे जगाला, मन व्हावे धुंद.
  हलत्या गाडीत स्पर्श तो कलत्या कायेचा
  चुळबुळ दोघांची, अहा तो क्षण आनंदाचा!!
 •  
 • पुरणा वरणाचा असावा घरामधे बेत
  अभ्यासामध्ये कसे मग लागावे चित्त?
  बुडवावी शाळा मनाला मोह असा व्हावा
  परंतु आईला कसा हा मार्ग मानवावा?
  बळेच शाळेला निघावे, मनात चडफडुनी
  आणि दहा वेळा बघावे मागे फिरफिरुनी.
  पाउल शाळेत ठेविता चमत्कार व्हावा
  फलक लाविलेला दारी ठळक दिसुनि यावा.
  'क्रीडास्पर्धेत अपुला क्रमांक ये पहिला
  आनंदासाठी आज त्या सुट्टी शाळेला!'
  पळत घरी यावे दूर ते दप्तर फेकावे
  अन् आनंदाने थयथया घरभर नाचावे.
  आणि भोजनाचा काय मग वर्णावा थाट?
  अशा प्रसंगांचा जिभेला येईल का वीट?
  थोरपणीसुद्धा मनावर उरे ठसा ज्याचा
  बालपणामधला, अहा तो क्षण आनंदाचा!!
 •  
 • नुक्ती झालेली सुदैवे पगारात वाढ
  अर्धांगीचेही त्यामुळे मन आनंदात
  मित्र बालपणचा अचानक आला भेटीला
  क्षणात ओळखले पाहिजे काय बिचाऱ्याला.
  खडतर दैवाने गांजिले, द्रव्यहीन झाला
  न बोलता दिधले 'पाहिजे होते ते' त्याला.
  डोळ्यातुनी अमुच्या वर्षला मेघ अमृताचा
  अमोल अविनाशी, अहा तो क्षण आनंदाचा!!

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

 1. आधी बीज एकले - संत तुकाराम
 2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
 3. लख लख चंदेरी - शेजारी
 4. मन सुद्ध तुझं - कुंकू
 5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
 6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
 7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
 8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

शांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी "याला जीवन ऐसे नाव" ही व्ही सी डी पहा