१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

सायंकाळ

साहित्याची आवड, भाषेची ओढ, लहानपणीचे संस्कार आणि तीस वर्षे पुस्तकांशी राखलेली मैत्री यामुळे आठवले यांचा ओढा साहजिकच सतत लिखाणाकडे होताच. ज्या ज्या वेळी हातात चित्र नसे किंवा दोन चित्रांमधे रिकामा वेळ असे, तेव्हां तेव्हां आठवले वाचन करीत. अध्यात्म, संत साहित्य, तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि भविष्य अशा अनेकविध विषयांवरील ग्रंथ ते वाचीत. Reader's Digest, Coronet, Imprint, Saturday Evening Post यांसारख्या नियतकालिकांचे ते वर्षानुवर्षे वर्गणीदार होते. घरात धान्यापेक्षा ग्रंथांचा साठा जास्त असे. त्यांनी आपल्यामागे दीड हजार ग्रंथांची अनमोल संपत्ती ठेवली होती. जे वाचले आणि भावले त्याची टिपणे काढून ठेवण्याची त्यांची सवय होती. टिपणांच्या वह्यांचे ढीग होते. आता त्यांचा उपयोग करायची वेळ आली. ती टिपणे आणि स्वत:चे विचारमंथन यातून लिखाणाला प्रारंभ झाला. कथालक्ष्मी, वान्ग्मयशोभा या मासिकातून, सकाळ, केसरी, स्वराज्य या वर्तमानपत्रातून लेख प्रसिद्ध होऊ लागले. त्यांनी परदेशी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक यांची छोटी छोटी परिचयात्मक चरित्रेसुद्धा 'रसरंग' या नियतकालिकासाठी लिहिली. अभ्यासपूर्ण लेखांचे संपादन करुन ग्रंथ साकार होऊ लागले. आठवले यांनी स्वत:ची एक प्रकाशन संस्थाही काढली. त्यांचे 'गायत्री प्रकाशन', मनोहर केळकर यांचे 'मनोहर ग्रंथमाला' यांच्या तर्फे पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली. गेल्या तीस वर्षात केलेली तयारी इतकी जय्यत होती की पहिले पुस्तक लगेच म्हणजे १९६७ सालीच प्रसिद्ध झाले.

हिंदु धर्मात आणि भारतीय संस्कृतीत रुढी, नियम, दिनचर्या म्हणून ज्या गोष्टी आचरायला, पठण करायला सांगितल्या आहेत त्यामागे अतिशय निश्चित अशा स्वरूपाचा शास्त्रीय दृष्टीकोन आहे. ते थोतांड तर नक्कीच नाही. ते सर्व नीतिनियम शास्त्रीय पद्धतीने तपासून घेतले आहेत आणि ते त्या कसोटीवर चोख उतरतात असे सिद्ध झाले आहे. त्यांच्या नियमित आचरणाने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखता येते. आपल्या अवतीभोवती तशी पूर्वी होऊन गेलेली आणि सध्या अस्तित्वात असलेली अनेक उदाहरणे आहेत. या गृहितावर आधारित विवेचन करणारे - शांताचिया घरा, साधा विषय मोठा आशय, ओंकारहस्य, सुखाची लिपी, कुंडलिनी जगदंबा, बकुल फुले हे ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यात दिलेली आपल्या देशातील आणि परदेशातील, व्यक्ती आणि प्रसंग यांची उदाहरणे त्यांच्या चौफेर वाचनाची साक्ष देतात. प्रभात फिल्म कंपनीत संत ज्ञानेश्वर हा चित्रपट तयार होत असताना आठवले यांची ज्ञानेश्वरीशी झालेली ओळख त्यांनी प्रयत्नपूर्वक वाढवली. तिचा कसोशीने अभ्यास केला, आणि तिचे साहित्यिक सौंदर्य दाखवणारा 'ज्ञानदेवीची आराधना' हा ३५० पानांचा ग्रंथ लिहिला. आठवले यांचा ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास होता. त्यातील नाडीग्रंथ या चमत्कारावर प्रकाश टाकणारा संशोधनपर निबंध त्यांनी पुस्तकरूपाने लिहिला. प्रभात फिल्म कंपनीत व्यतीत केलेल्या काळातील आठवणींवर आधारित 'प्रभात फिल्म कंपनी'चा इतिहास आठवले यांनी 'प्रभातकाल' या पुस्तकाद्वारे वाचकांना कथन केला.

Pravachankar Shantaram Athavaleजे उत्कटतेने वाटते, प्रकर्षाने पटते ते व्यक्त करण्याचा लिखाण हा जसा एक मार्ग होता तसं त्यासंबंधी लोकांसमोर बोलणे हाही एक मार्ग होता. आठवले यांना रसिकांनी तोही अवलंबायला लावला. त्यांनी अध्यात्म, ओंकार, भारतीय संस्कृती, ज्ञानेश्वरी अशा त्यांच्या अभ्यासाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवर देशभर प्रवचने दिली. साधारण पाच वर्षांच्या कालावधीत चारशेहून आधिक व्याख्याने देण्याचा विक्रम त्यांनी केला. त्यातून अर्थार्जन कधीच अपेक्षित नव्हते, उलट बऱ्याच वेळा स्वत:च्या खिशालाच खर लागे. या प्रवचनातून अनेकांना लाभ झाला, जीवनाचा अर्थ कळला, मार्ग सापडला, प्रश्न सुटले, नवी दृष्टी मिळाली. त्या बरोबरच आठवले यांनाही अगणित ज्ञानी, साधक भेटले, अनुभवांची खाण गवसली, नवे विषय, नवी माहिती सापडली, दृष्टीकोन विस्तृत झाला, मन समृद्ध झाले.

काव्याच्या प्रांतातला प्रवास तर लहानपणापासूनच चालूच होता. त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह 'एकले बीज' या नावाने १९३८ साली म्हणजे ते प्रभातकवी झाल्यानंतर प्रसिद्ध झाला. त्या पाठोपाठ १९४० साली 'बीजांकुर' हा दुसरा प्रसिद्ध झाला. 'सकाळ', 'स्वराज्य' ही वर्तमानपत्रे, 'मनोहर', 'वांग्मयशोभा' यांसारख्या मासिकात, 'शालापत्रक' या लहान मुलांच्या मासिकात त्यांच्या कविता नेहमी प्रसिद्ध होत असत. साध्या, सोप्या, अर्थपूर्ण गीते हे खास वैशिष्ठ्य असलेल्या आठवल्यांची कविता मात्र बुद्धीची उंची, विचारांची खोली, अनुभवांचा विस्तार याने आलेल्या सुजाणपणाला कल्पनाशक्तीची जोड मिळाल्याने अंगी मुरलेल्या निर्भेळ, खेळकर विनोदाने नटलेली आहे. त्यात चिमटे नाहीत, गुदगुल्या आहेत, एक निरोगी मिस्किलपणा आहे. त्या वाचल्यावर वाचकांना स्वानुभवाचा, किंवा अव्यक्त भावनांचा प्रत्यय येऊन हमखास खुदकन हसायला येते. या कविता एका ओळीच्या, दोन ओळींच्या, तीन ओळींच्या चार ओळींच्या अशाही आहेत. त्यांनी आपल्या जीवनातील काही आनंदाचे क्षण टिपून ते काव्यात वाचकांपुढे ठेवले. त्याला शीर्षक दिले "अहा तो क्षण आनंदाचा!" ते वाचताना 'खरंच, हा अनुभव माझाही आहे!' असा प्रत्यय बऱ्याच लोकांना येईल आणि त्याच्या पुन:प्रत्ययाचा मजेशीर आनंद मिळेल.

Shantaram Athavale, Mangala (Daughter), Sumati Athavaleआठवले यांना लहान मुलांचे भारी वेड. त्यांच्या तीन मुलांसाठी, आजूबाजूच्या बालचमूंसाठी, पुढे त्यांच्या नातवंडांसाठी त्यांनी अनेक बालगीते, बडबडगीते, बोधगीते लिहिली. एखाद्या छोट्याला कडेवर घेऊन रस्त्यावर हम्मा, शेळी, इंजिन दाखवत, गाणी गात जाणारे मुलांचे लाडके 'तात्या' हे अगदी नेहमीचे दृष्य असे. त्यांच्या या आवडीमुळेच त्यांची चित्रपटांसाठी लिहिलेली सर्व अंगाईगीते अतिशय प्रेमळ, लडिवाळ आणि अर्थगर्भ आहेत. त्यांची मुले शाळेत शिकत असताना येणारे विषय कित्येकदा ते कवितेत समजावून देत. उदाहरण द्यायचे झाले तर अकबर राजाचा नवरत्न दरबारातील रत्नांची नावे आणि त्यांचे कार्य त्यांनी एका कवितेत गुंफले होते. इंग्लिश कवितांचे अर्थ ते मुलांना त्यांची सहजपणे भाषांतरे करुन समजावून सांगत.

आठवले यांच्या व्यक्तीमत्वात साधेपणा होता. तो त्यांच्या काव्यात उतरला होता की काव्यातला साधेपणा व्यक्तीमत्वात हे सांगणे कठीण आहे. पांढरे स्वच्छ, स्वत: धुतलेले, घडी घालून जोरजोरात थापटून वाळत घालून चुरचुरीत केलेले धोतर, पांढराच अर्ध्या बाह्यांचा शर्ट, आणि त्यावर कोट असा त्यांचा पोशाख असे.

Shantaram Athavaleचित्रीकरणाच्या वेळी कोट काढून ठेवत. त्यांच्या चित्रपटाची गुणवत्ता आणि त्यांच्या चित्रीकरणाचा झपाटा दोन्हीमुळे त्यांचे चित्रीकरण पाहायला लोक कुतुहलाने येऊन उभे राहत. विशेषत: हिंदी चित्रपटातील लोक. आठवले यांचा दुसरा चित्रपट सुरु होऊन संपत आला तरी त्यांचे पहिले चित्रच रखडत असायचे. त्यांना 'धोतीवाला डायरेक्टर' असे म्हणत. संपूर्ण चित्रपटाची पटकथा, संवाद, गीते, प्रत्येक शॉट कसा घ्यायचा, कॅमेरा कुठे कसा असेल हे सर्व तपशील चित्रीकरणापूर्वीच तयार असे. प्रत्येक दिवसाचे वेळापत्रकही आखलेले असे. त्यामुळे वेळ वाया जाणे माहीतच नव्हते. 'वहिनींच्या बांगडया' हा चित्रपट केवळ पास्तिस दिवसात पुरा होण्याला हे नियोजनच कारणीभूत होते.

Shantaram Athavaleत्यांच्या स्वभावातले सौजन्य लगेच जाणवे. ते चित्रपटसृष्टीत फारसे उपयोगी पडले नाही, खरे तर विरुद्धच गेले पण तरीही त्यांनी ते सोडले नाही. साधेपणा, सौजन्य, बुद्धीची चमक, उत्तुंग कल्पनाशक्ती, चौफेर अनुभव, संवेदनशीलता , बहुश्रुतता, लख्ख विचार, परखड मते आणि नर्म विनोद या गुणांमुळे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. विविध क्षेत्रातला होता, त्याला वय, दर्जा अशी परिमाणे आड येत नसत. ते सर्वांना आपले वाटत. चित्रपटातील मान्यवरांपासून सहाय्यक तंत्रज्ञ, कलाकार, अगदी लाईट बॉईज पर्यंत, प्रथितयश साहित्यिकांपासून नवोदित कवी लेखकांपर्यंत, अध्यात्मातील अधिकारी साधु संतांपासून नवागत साधकांपर्यंत, मुलांच्या शाळा कॉलेजमधील तरुण मित्र, मैत्रिणी, शेजारी पाजारी, आळीकर, वर्षानुवर्ष त्यांच्या घराशी संबंध जुळलेले दुधवाले, भाजीवाले, वाणी, अगदी पोस्टमन सुद्धा – या सगळ्यांनी त्यांचा स्नेहपरिवार समृद्ध झाला होता. त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांनाच सहजपणे आकर्षित करीत असे. त्यांच्या सहवासात समईसारखा शांत प्रकाश, चंदनासारखा मंद, मोहक सुगंध आणि निरलस आनंद मिळत असे. कितीतरी लोकांची आयुष्ये त्यांच्या सहवासात येऊन उजळली, उमलली, दरवळली.

आपले कलाजीवन आसक्तीने जगलेले आणि तितक्याच विरक्तीने अध्यात्मात रमलेले आठवले २ मे १९७५ ला हे जग सोडून गेले. त्यांच्या आठवणी, कविता, गीते आणि कलाकृती हाच आपला ठेवा आहे.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

  1. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १



  2. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2



  3. चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले