कोरेगावला ना.ह.आपटे यांच्या 'मधुकर' मासिकाच्या पत्रव्यवहारात एक दिवस एक लक्ष वेधून घेणारे, हिरव्या शाईत लिहिलेले पत्र आले. त्याखाली मोठ्या, स्वच्छ, वळणदार अक्षरात डौलदार सही होती –
व्ही शांताराम. प्रभात फिल्म कंपनी पुण्याला स्थलांतर करणार होती. त्यानंतर ना ह आपटे यांना त्यांनी भेटायला बोलावले होते. प्रभात फिल्म कंपनी आपटे यांच्या 'भाग्यश्री' या कादंबरीवर आधारित चित्रपट तयार करू इच्छित होती. भेटीत त्या योजनेवर शिक्कामोर्तब झाले. चित्रपटाचे नाव ठरले 'अमृतमंथन'. आठवले यांच्या साध्या सोप्या काव्यरचनेने आपटे खूपच प्रभावित झालेले होते त्यामुळे त्यांनी त्या चित्रपटाची गीते लिहिण्यासाठी आठवले यांचे नाव सुचवले आणि सुदैव असे की ते मान्यही झाले.
त्यावेळी प्रभातचे कार्यालय डेक्कन जिमखाना भावेस्कूलच्या समोर 'जगदीश निवास' येथे होते. व्ही शांताराम यांच्याशी आठवले यांची प्रथम भेट तिथेच झाली. त्याच भेटीत संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे यांनी आठवले यांच्याशी हस्तांदोलन केले. शब्द आणि सूर यांचा 'समसमां संयोग की जाहला'.
केशवराव ऑर्गनवर एक चाल वाजवू लागले. त्या सुरांवर गीत रचायचे होते. चाल पुन्हा पुन्हा वाजत होती, सूर शब्दाना आवाहन करू लागले, कागदावर गीत जन्म घेऊ लागले.
गीत पुरे होईपर्यंत मनाला स्वस्थता नव्हती, चैन नव्हते. पण ते पूर्ण झाले, पसंतीलाही उतरले. ती आठवले यांच्या तोवरच्या जीवनातील सर्वात 'सुखद निशा' होती.
'अमृतमंथन' मधील गीतांनी आठवले यांना प्रभातमध्ये कायम स्वरुपाची नोकरी मिळणे शक्य झाले. १ जानेवारी १९३५ या दिवशी आठवले प्रभात फिल्म कंपनीच्या संगीत विभागात रुजू झाले. गीतकार किंवा पद्यलेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. प्रभात आणि आठवले यांची ही युती चित्रपटगीताच्या इतिहासाच्या सोनेरी पर्वाची आणि आठवले यांच्या चित्रपटसृष्टीतल्या वैशिष्ठ्यपूर्ण कारकीर्दीची 'प्रभात' ठरली. चित्रपट हे त्यांचे कार्यक्षेत्र ठरून गेले. चित्रपटसृष्टीने – विशेषत: प्रभातने - आठवले यांना आणि आठवले यांनी चित्रपटसृष्टीला श्रीमंत केले.
कथानक, त्यामधला गाण्याचा प्रसंग, त्यानुरूप आधी चाल आणि मग त्यावर शब्दरचना – अशी कसरत असूनही गीतात काव्य, भाषेचा गोडवा, कल्पनेचे नाविन्य, शब्दांचे नादमाधुर्य आणि कुणालाही चटकन समजेल, उमजेल आणि भावेल असा साधेपणा आणि सोपेपणा राखायचे अवघड काम शांताराम आठवले यांनी करुन दाखवले म्हणूनच त्यांचे स्थान 'चित्रपटगीतांचे आद्यकवी' असे आहे. ग दि माडगुळकर यांच्यासारख्या गीतकाराने चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना ' मला शांताराम आठवले व्हायचे आहे' असा आदर्श ठेवला होता.
'अमृतमंथन' नंतर संत तुकाराम, कुंकू, गोपालकृष्ण, माझा मुलगा, संत ज्ञानेश्वर, शेजारी, संत सखू, दहा वाजता आणि रामशास्त्री (यातील एकच गीत) या प्रभातचित्रांसाठी आठवले यांनी गीते लिहिली. केशवराव भोळे आणि मास्टर कृष्णराव यांच्या अप्रतिम संगीताने ती अजरामर झाली.
प्रभातची अतिशय उच्च दर्जाची निर्मितीमूल्ये, प्रतिभाशाली दिग्दर्शन या बरोबरच त्यातील आठवले यांनी लिहिलेली भावपूर्ण भावगीतासारखी, त्या वेळच्या प्रचलित शैलीपेक्षा वेगळ्या वळणाची, अत्यंत सोपी, सरळ, अर्थवाही गीते हे त्या सर्व चित्रांचे डोळ्यात भरणारे, काना मनात गुंजत राहणारे, जिभेवर घोळणारे वैशिष्ठ्य ठरले. त्यातील अनेक गीतांनी इतिहास घडवला.
दहा चित्रपटांतील साध्या सोप्या शब्दातल्या परंतु अर्थपूर्ण मोहक गीतांमुळे आठवले यांना प्रसिद्धी मिळाली, त्यांच्या गीतांमुळे चित्रपट यशस्वी झाले, चित्रपटरसिकांनी त्यांच्या गीतांसाठी चित्रपट पाहिले, साहित्यिकांनीही त्यांची गीते नावाजली. 'केसरी' सारख्या वृत्तपत्राने देखील त्यांच्या 'आधी बीज एकले' या गीताचे कौतुक करणारे स्फुट लिहिले होते. त्यांच्या गीतांच्या ध्वनीमुद्रिकांना प्रचंड खप होता. म्हणूनच एच एम व्ही कंपनीने पुढेही त्यांच्याकडून पुष्कळ गीते लिहून घेतली. ती नामवंत संगीतकारांकडून स्वरबद्ध करुन घेऊन, लोकप्रिय गायक गायिकांकडून गाऊन घेऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. त्यांच्याकडून "दोन ग्रामीण, एक प्रेमाचे युगलगीत, दोन दु:खी अशी पाच गाणी पाठवा" अशी गाण्यांची मागणी येत असे. कवी आणि आद्य गीतकार असे मानाचे स्थान त्यांनी संपादन केले. त्यांच्या अशा नाव लौकिकामुळे त्यांना, प्रभातच्या चालकांच्या परवानगीने, 'भरतभेट', 'आपले घर' अशा काही प्रभात बाहेरच्या चित्रांसाठीही गाणी लिहावी लागली.
प्रभात मधील नोकरीत त्यांच्यावर 'सहाय्यक दिग्दर्शक' अशीही जबाबदारी होती. तीही आठवल्यांनी समर्थपणे पार पाडली. कलाकारांच्या संवादाच्या तालमी घेणे, त्यांची भाषा, शब्दोच्चार सुधारणे, संवादाची फेक कशी करावी हे शिकवणे ही कामे सुरवातीला त्यांना देण्यात आली होती. दिलेले काम चोख करण्याची हातोटी, वक्तशीरपणा, उत्साह आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांची कामे वाढतच गेली, आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांनीही मुमुक्षु वृत्तीने चित्रपटकलेच्या सर्व अंगांचा सांगोपांग अभ्यास केला. कथेची निवड, तिचे वाचन, पटकथा लेखन, संवाद, प्रत्यक्ष चित्रीकरण, संकलन, इतकेच नव्हे तर वितरण, जाहिरात अशा अनेक क्षेत्रात त्यांना काम करायला मिळाले आणि त्यांनीही त्या प्रत्येकात आपल्या प्रतिभेच्या सामर्थ्याने आणि अपार कष्टांच्या बळावर त्यावेळी प्रभातमध्ये उपलब्ध असलेल्या असामान्य ताकदीच्या अथी रथी महारथींकडून चित्रपटकलेचे ज्ञान मिळवून त्यावर प्रभुत्व प्राप्त केले.
व्ही शांताराम यांच्यासारखा सिद्धहस्त दिग्दर्शक, विष्णुपंत दामले (दामलेमामा) यांच्यासारखा हाडाचा तंत्रज्ञ, एस फत्तेलाल (साहेबमामा) यांच्यासारखा मनस्वी चित्रकार, के नारायण काळे, अनंत काणेकर, यांच्यासारखे मराठीतले आणि पंडित सुदर्शन, पं. मुखराम शर्मा, कवी अनुज यांच्यासारखे हिंदीतले साहित्यिक, चंद्रमोहन, केशवराव दाते, शांता आपटे, बालगंधर्व यांसारखे मातब्बर कलाकार, एवढंच नव्हे तर राजा नेने, वसंत देसाई यांच्यासारखे कसबी सहकारी या सर्वांकडून आठवले चित्रपटकला शिकले. एखादा प्रसंग, एखादा संवाद, अभिनयाची विशिष्ठ लकब, कॅमेराचे स्थान, लाईटची चपखल जागा यांचा परिणाम पडद्यावर पहाताना प्रेक्षकांवर नेमका कसा होणार आहे याचा अचूक अंदाज ही चित्रपटतंत्रातील, विशेषत: दिग्दर्शनातील महत्वाची खुबी ते आत्मसात करू शकले. चित्रपटक्षेत्रातील त्यांच्या यशस्वी कारकीर्दीचा भक्कम पाया इथेच बांधला गेला.
प्रभातमध्ये काम करीत असतानाच १९३९ च्या जून महिन्यात आठवले यांचा विवाह झाला. रामदुर्ग संस्थानचे कारभारी श्री सहस्रबुद्धे यांची कन्या लीला हिने 'सुमती' या नावाने आठवले यांच्या आयुष्यात प्रवेश केला आणि पुढील पाच वर्षात दोन मुली – मंगला, अभया आणि एक मुलगा – सुदर्शन यांनी घर गजबजून गेले.
विवाह झाल्याबरोबर आठवले यांनी टिळकरोड वरील बादशाही बोर्डिंगच्या आतल्या गल्लीत एका दगडी बंगल्यातल्या आगगाडीच्या डब्यासारख्या सरळ चार खोल्यांच्या भाड्याच्या घरात आपला संसार मांडला. १९६/८८ सदाशिव पेठ आणि नंतर त्याचाच बदलून १६१३ सदाशिव पेठ या पत्त्यावरच त्यांचा शेवटपर्यंत मुक्काम राहिला.
शेजारी चित्रपटानंतर व्ही शांताराम आणि प्रभातचे इतर भागीदार यांच्यात कुरबुरी सुरु झाल्या. १३ एप्रिल १९४२ रोजी व्ही शांताराम यांनी प्रभात सोडली. त्यानंतर प्रभातमध्ये अशा काही घटना घडत गेल्या की ज्या प्रभातवर निस्सीम प्रेम केले तिथे काम करणे अशक्य झाले. १९४३ सालच्या दिवाळीत नरकचतुर्दशीच्या दिवशीच आठवल्यांच्या जीवनात अंधार पसरला. त्या दिवशी आठवले यांनी प्रभात सोडली.
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले